Home Cities अमळनेर अमळनेर व पारोळा तालुका कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा ; आ. अनिल पाटलांची...

अमळनेर व पारोळा तालुका कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा ; आ. अनिल पाटलांची शासनाकडे आग्रही मागणी

0
12


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली आहेत. ऐन वाढीच्या टप्प्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली असून बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर व संकटमय परिस्थितीची दखल घेऊन शासनाने अमळनेर व पारोळा तालुका त्वरित ‘कोरडा दुष्काळसदृश्य’ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शासनदरबारी केली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी बँक, पतसंस्था तसेच विविध वित्तीय संस्थांकडून पीक कर्जे काढून शेतीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, पावसाच्या अभावामुळे पिके पूर्णपणे सुकू लागल्याने मोठे आर्थिक नुकसान अटळ दिसत आहे. कर्जाचा वाढता डोंगर आणि उत्पादनाची नसलेली हमी यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या बिकट परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार अनिल पाटील यांनी मुंबईत वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीदर्शक निवेदने सादर केली. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन मतदारसंघातील शेतीच्या भयावह परिस्थितीची सविस्तर माहिती दिली.

आमदार पाटील यांनी सादर केलेल्या निवेदनाद्वारे अमळनेर व पारोळा तालुक्यातील शेतीचे तातडीने सर्वेक्षण करून पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच दोन्ही तालुक्यांना कोरडा दुष्काळसदृश्य क्षेत्र घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक विमा भरपाई आणि शासकीय सवलतींचा लाभ मिळवून देण्याचा आग्रह धरला आहे. शेतकरी संकटात असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आपली पहिली प्राथमिकता असल्याचे सांगत, आमदार अनिल पाटील यांनी याप्रकरणी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.


Protected Content

Play sound