


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या घनकचरा डम्पिंग ठिकाणी कचरा व्यवस्थापनाची स्थिती पाहण्यासाठी चार नगरसेविका आणि गटनेत्या नंदा महाजन यांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण होत नसल्याचे तसेच उपलब्ध मशिनरीचा अपेक्षित वापर होत नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा नगरसेविकांनी केला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा विषय असल्याने प्रशासनाने तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेविकांनी डम्पिंग ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कचरा व्यवस्थापनाची पाहणी केली. यावेळी कचऱ्याचे व्यवस्थापन अत्यंत असमाधानकारक असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक तसेच इतर प्रकारच्या कचऱ्याचे नियमानुसार वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असताना त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याचे नगरसेविकांचे म्हणणे आहे. डम्पिंग ठिकाणी उपलब्ध असलेली मशिनरी वापराविना पडून असल्याचेही पाहणीदरम्यान आढळल्याचे नगरसेविकांनी सांगितले. नवीन मशिनरी आणण्यात आली असतानाही तिचा योग्य पद्धतीने वापर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करून कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढत्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास दुर्गंधी, अस्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करणे, प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे तसेच उपलब्ध यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने वापर करणे आवश्यक असल्याचे नगरसेविकांनी नमूद केले.
घनकचरा व्यवस्थापन हा केवळ शहराच्या स्वच्छतेचा विषय नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. डम्पिंग ठिकाणी असलेल्या त्रुटी दूर करून कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था सुरळीत आणि नियोजनबद्ध करावी, अशी ठाम भूमिका नगरसेविकांनी मांडली. या पाहणीमध्ये गटनेत्या नंदा राजेंद्र महाजन यांच्यासह नगरसेविका कल्पना दिलीप वाणी, शुभांगी रोशन येवले आणि सविता विजय नन्नवरे सहभागी झाल्या. त्यांनी डम्पिंग ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि शहराच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार नगरसेविकांनी व्यक्त केला. घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून यावल शहर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.



