Home Cities जळगाव तरसोद जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती निर्मितीची कार्यशाळा

तरसोद जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती निर्मितीची कार्यशाळा

0
35


तरसोद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तरसोद येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यशाळेत गजेंद्र परदेशी  यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. मूर्ती तयार करण्याची पद्धत, मातीचा वापर, मूर्तीला आकार देण्याची प्रक्रिया तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे महत्त्व या उपक्रमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत स्वतः गणपतीची मूर्ती तयार करण्याचा अनुभव घेतला.

या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा तरसोदचे मुख्याध्यापक मिलिंद रामकृष्ण कोल्हे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उज्वला सारंग कुलकर्णी, अजय पुंडलिक शिरसाठ, जगदीश साहेबराव जाधव, सुषमा पुंडलिक पाटील आणि जयश्री देविदास महाजन यांनी सहकार्य केले. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासोबतच पारंपरिक सण पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता साजरे करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या उपक्रमामुळे शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.


Protected Content

Play sound