Home प्रशासन सावदा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उत्साहात

सावदा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उत्साहात

0
9


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच उत्सव अत्यंत उत्साहात आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पाडावा, या उद्देशाने सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६:३० या वेळेत जेहरा मॅरेज हॉल, सावदा येथे शांतता समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील (मुक्ताईनगर विभाग), सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय स्थानिक पत्रकार बांधव, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पोलीस पाटील, मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी आणि हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये श्री गणेशमूर्तींची निश्चित उंची, मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस निर्माण होणारे संभाव्य अडथळे, गणेश आगमनाचे सोहळे आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांची पुनर्रचना व नियोजन या बाबींचा समावेश होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकांचा हवाला देत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या कायदेशीर व सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील विविध अडचणी व स्थानिक समस्या प्रशासनासमोर मांडल्या. या सर्व समस्यांची दखल घेत पोलीस व इतर प्रशासकीय विभागांच्या समन्वयातून मार्ग काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. विशेषतः अखंड वीजपुरवठा, वाहतूक नियंत्रण, विसर्जन मार्गावरील स्वच्छता व प्रकाश व्यवस्था तसेच सार्वजनिक सुरक्षिततेविषयी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जागेवरच आवश्यक निर्देश देण्यात आले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी प्रशासकीय नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि उत्सव शिस्तबद्ध व शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच सर्व पोलीस पाटलांना आपापल्या कार्यक्षेत्रात सतर्क राहून विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.


Protected Content

Play sound