Home क्राईम ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट; नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!

ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट; नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!

0
35


नशिराबाद-हरिश पाटील । तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर एआय जनरेटेड व्हिडिओ तसेच विविध पोस्ट प्रसारित केल्याच्या कथित प्रकरणाचा तपास आता नशिराबादपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. संबंधित अकाउंटवर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल छायाचित्रे आणि विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले आहे. या डिजिटल कंटेंटच्या निर्मिती व प्रसारणामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

तपासाचा एक भाग म्हणून संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सचे आयपी लॉग, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील तसेच वापरण्यात आलेली डिजिटल उपकरणे यांची माहिती तपासली जाण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया अकाउंट कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणांद्वारे हाताळण्यात आले, तसेच त्यावरून नेमका किती डिजिटल कंटेंट प्रसारित करण्यात आला, याबाबतही तपास सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, नशिराबाद पोलीस ठाण्यात मोहम्मद जुनेद शेख याची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणातील त्याचा नेमका सहभाग काय आहे, हे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. तपासातील निष्कर्ष आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाणार असून, आवश्यक असल्यास त्याला पुढील तपासासाठी चेन्नई येथे नेले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चेन्नईतील सायबर क्राईम पथक थेट नशिराबादमध्ये दाखल झाल्याने परिसरात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. बनावट अकाउंट कोणी तयार केले, एआय जनरेटेड व्हिडिओ आणि पोस्ट नेमक्या कोणत्या उद्देशाने प्रसारित करण्यात आल्या, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा आता सायबर तपासातून होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाशी संबंधित सोशल मीडिया अकाउंटच्या तपासाने नशिराबादपर्यंत मजल मारल्याने या प्रकरणाकडे आता स्थानिक पातळीवरही लक्ष लागले आहे. सायबर पोलिसांच्या तपासातून डिजिटल पुरावे हाती लागल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound