


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पश्चिम वन विभागाच्या गस्ती पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अवैधरीत्या वृक्षतोडीचे लाकूड वाहतूक करणारे चारचाकी वाहन जप्त केले आहे. ७ सप्टेंबर रोजी हरिपुरा, जामन्या व वड्री धरण ते वड्री रस्त्यादरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत वाहनासह लाकूड असा एकूण ३ लाख ६० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला आहे. कारवाईदरम्यान वाहनचालक वाहन सोडून पसार झाल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.
यावल पश्चिम वनक्षेत्रातील गस्ती पथक ७ सप्टेंबर रोजी हरिपुरा-वड्री परिसरात नियमित गस्तीवर होते. यावेळी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परिसरात अधिक दक्षतेने तपासणी सुरू करण्यात आली. गस्तीच्या वेळी एक पिकअप वाहन संशयास्पदरीत्या जाताना आढळून आले. पथकाने चौकशीसाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन जागेवर सोडून तेथून पसार झाल्याचे समोर आले. वन कर्मचाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरीत्या वाहतूक केले जात असल्याचा संशय असलेले जळाऊ लाकूड आढळून आले. वाहन क्रमांक एमएच १९ एस ४६९६ असून, त्यामध्ये अंदाजे ०६ घनमीटर जळाऊ लाकूड असल्याची नोंद करण्यात आली आहे. वाहन आणि लाकूड असा जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ६० हजार ८ रुपये असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेले वाहन व लाकूड पंचनामा करून पावतीद्वारे यावल येथील मुद्देमाल वाहन केंद्रात जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी हरिपुरा पूर्व वनक्षेत्राकडून प्रकरण नोंद क्र. ०५/२०२६, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ जारी करण्यात आला आहे. वाहनचालक वाहन सोडून पसार झाल्याने त्याचा शोध घेण्यासह लाकडाचा स्रोत आणि वाहतुकीबाबत पुढील तपास सुरू आहे.
या वनगुन्ह्याचा पुढील तपास वनपाल हरिपुरा एस. बी. इंडे करीत आहेत. अवैध वृक्षतोड तसेच वनसंपत्तीची विनापरवानगी वाहतूक करणाऱ्यांवर वन विभागाकडून कारवाई सुरूच राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. ही कारवाई उप वनसंरक्षक सौरिष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक एस. ए. पाटील तसेच यावल पश्चिम वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल पी. डी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल डी. ए. परदेशी (जामन्या), वनरक्षक एस. एस. भोंगरे (हरिपुरा पूर्व), एस. पी. भालेराव (हरिपुरा), एस. बी. पाटणे, दीपक चव्हाण, राजेश बरेला तसेच वनसेवक राजू तडवी आणि शकील तडवी यांनी सहभाग घेतला.



