Home क्राईम पहाटे नशिराबाद पोलिसांचा धडाका ; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वॉरंटमधील आरोपी जेरबंद, २७ संशयित...

पहाटे नशिराबाद पोलिसांचा धडाका ; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वॉरंटमधील आरोपी जेरबंद, २७ संशयित वाहने ताब्यात

0
30


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नशिराबाद पोलिसांनी मंगळवारी पहाटे धडक कोम्बिंग ऑपरेशन राबविले. पहाटे ३ ते सकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू असलेल्या या अचानक कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली. या मोहिमेदरम्यान न्यायालयीन वॉरंटमधील एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले, तर २७ संशयित वाहने ताब्यात घेतली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. पहाटेच्या वेळी अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे परिसरातील संशयित हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी विविध संशयित ठिकाणी अचानक तपासणी केली. या तपासणीत न्यायालयीन वॉरंट बजावलेला एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. याचवेळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मोहिमेदरम्यान तीन हद्दपार इसमांची तपासणी करण्यात आली. तसेच पाच हिस्ट्रीशीटर आणि तीन आरोपींची झडती घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

पहाटेच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत संशय असलेल्या वाहनांचीही पोलिसांनी तपासणी केली. या कारवाईत तब्बल २७ संशयित वाहने ताब्यात घेण्यात आली. वाहनांची कागदपत्रे आणि संबंधित बाबींची तपासणी करून नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नशिराबाद परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींवर वेळीच अंकुश ठेवणे, संशयास्पद हालचालींना आळा घालणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे या उद्देशाने अशा प्रकारच्या अचानक तपासणी व कोम्बिंग मोहिमा यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound