Home Cities यावल शिक्षक दिनी मनविसेचा अनोखा उपक्रम; यावल तालुक्यातील शाळांना प्राथमिक उपचार पेट्यांचे वाटप

शिक्षक दिनी मनविसेचा अनोखा उपक्रम; यावल तालुक्यातील शाळांना प्राथमिक उपचार पेट्यांचे वाटप

0
12


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे यावल तालुक्यातील नायगाव व किनगाव जिल्हा परिषद केंद्रांतर्गत विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करून शाळांना प्राथमिक उपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

किनगाव, नायगाव, मालोद, खालकोट, निमछाव, इचखेडा आणि वाघझिरा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांना या उपक्रमांतर्गत प्राथमिक उपचार पेट्या देण्यात आल्या. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत किंवा अचानक आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास तातडीने प्राथमिक उपचार मिळणे आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी यावेळी शिक्षकांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, भावी पिढी घडविण्यासोबतच समाजाला दिशा देण्याचे कार्य शिक्षक करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी सातपुडा माध्यमिक विद्यालय, नायगावचे मुख्याध्यापक संजय देवरे, नेहरू विद्यालय किनगावचे मुख्याध्यापक रविंद्र सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खालकोटचे मुख्याध्यापक प्रशांत बाविस्कर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इचखेडाचे मुख्याध्यापक पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघझिराचे मुख्याध्यापक तडवी तसेच सातपुडा माध्यमिक विद्यालय नायगावचे ज्येष्ठ शिक्षक सूर्यवंशी सर, बोबडे सर, तडवी सर, माजी शिक्षक बी. डी. पाटील सर, माजी मुख्याध्यापक डी. जे. पाटील, वाय. डी. नायदे सर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारा खरा शिल्पकार आहे. त्यांचा सन्मान करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे हीदेखील समाजाची जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. 


Protected Content

Play sound