Home Cities मुक्ताईनगर जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात; ७५ विद्यार्थी बनले...

जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात; ७५ विद्यार्थी बनले ‘विद्यार्थी शिक्षक’

0
18


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आल्याने उपक्रमाला विशेष शैक्षणिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे सर आणि एस. एम. वाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील तब्बल ७५ विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी शिक्षक’ म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्ता नववीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. देवश्री विकास पाटील हिने विद्यार्थी मुख्याध्यापिका म्हणून पदभार सांभाळला. कु. शर्वरी केतन पाटील आणि कु. मनस्वी संदीप चौधरी यांनी विद्यार्थी उपमुख्याध्यापिका म्हणून विद्यालयाचे कामकाज पाहिले. तसेच सुजाता दांडगे आणि पूर्वजा बोंडे यांनी विद्यार्थी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमध्ये जाऊन अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिक्षकाची भूमिका पार पाडताना विद्यार्थ्यांना वर्गातील शिस्त, अध्यापनाची पद्धत, विद्यार्थ्यांशी संवाद तसेच शिक्षकांच्या जबाबदाऱ्या यांचा अनुभव घेता आला. विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून हा अनुभव आनंददायी तसेच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी विद्यालयाचे आभार मानले. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यावर संस्कार करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. जीवनात गुरुचे स्थान आणि महत्त्व अनन्यसाधारण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनातील शिक्षकांचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा परिचय करून देत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक जान्हवी विकास पाटील आणि श्रिया अनिल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका आर. व्ही. महाजन, उपशिक्षक एस. आर. ठाकूर, बी. एम. कोल्हे, व्ही. डी. पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound