


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बार असोसिएशनतर्फे जिल्ह्यातील वकील बंधू-भगिनींसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मा. न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम रविवारी, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत जिल्हा न्यायालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात पुराव्याच्या कायद्यातील तरतुदी आणि त्यांचा दिवाणी व फौजदारी प्रकरणांतील वापर, तसेच ‘Civil and Criminal Tackling’ या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. न्यायालयीन कामकाज करताना कायद्यातील तरतुदींचा प्रभावी वापर, प्रकरणांची हाताळणी आणि दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबी याबाबत उपस्थित वकिलांना मार्गदर्शन मिळणार आहे.
जळगाव जिल्हा बार असोसिएशनच्या आवाहनानुसार जिल्हा, शहर तसेच सर्व तालुक्यांतील वकील बंधू-भगिनींनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कायद्याच्या विविध तरतुदींचा प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजात कसा उपयोग करता येतो, याबाबत या कार्यक्रमातून मार्गदर्शन मिळणार असल्याने वकिलांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायालयातील बार रूम क्रमांक ११६ येथे करण्यात आले आहे. रविवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत चालणार आहे. जळगाव जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दर्शन भरत देशमुख यांनी सर्व वकील बंधू-भगिनींनी या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



