


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले भरत वामन वारे (वय ५२) यांचे शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने कृषी विभागासह यावल तालुक्यात शोककळा पसरली आहे.
भरत वामन वारे हे मूळचे अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी होते. मागील २०२३ पासून ते यावल तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत होते. आपल्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी कृषी विभागाच्या कामकाजात योगदान दिले. वारे हे यावल शहरातील तडवी कॉलनी परिसरात पत्नीसमवेत वास्तव्यास होते. शनिवारी रात्री सुमारे ७.३० ते ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे.
भरत वारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा तसेच कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आगमनानंतर अंत्यविधीबाबतची पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, या घटनेची यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वारे यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.



