Home क्राईम यावलमध्ये वनविभागाची धडक कारवाई ; खडकाई नदीच्या पात्रातून बेकायदेशीर सागवान कटाई जप्त

यावलमध्ये वनविभागाची धडक कारवाई ; खडकाई नदीच्या पात्रातून बेकायदेशीर सागवान कटाई जप्त

0
14


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहराला लागून असलेल्या खडकाई नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे लपवून ठेवलेला सागवानाचा साठा जप्त करण्यात वनविभागाच्या गस्ती पथकाला मोठे यश आले आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे वनविभागाने तत्काळ धाड टाकून ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात अवैध लाकूड तस्करांचे धाबे दणाणले असून वनविभागाने या प्रकरणी वनगुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

यावल वनविभागास ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:१० वाजेच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली होती की, शहरास लागून असलेल्या खडकाई नदीच्या पात्रातील प्रोसोपीस बाभळीच्या दाट झुडपांमध्ये अज्ञात तस्करांनी सागवान वृक्षांची कटाई करून ते लपवून ठेवले आहे. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या गस्ती पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. पंचांच्या समक्ष परिसराची बारकाईने पाहणी केली असता, तेथे बाभळीच्या झुडपांत लपवलेल्या सागवानाच्या ७ नग कटसाईज पाट्या आढळून आल्या. या लाकडांचे एकूण घनफळ ०.१७२ घनमीटर असून त्याची शासकीय मूल्यांकनानुसार नुकसान किंमत ३,८३१ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

घटनास्थळी पंचांच्या समक्ष रीतसर पंचनामा करून सर्व सागवान कटसाईज साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर शासकीय वाहनाद्वारे हा साठा मुख्य विक्री केंद्र, यावल येथे आणून ताबा पावतीद्वारे सुरक्षितपणे जमा करण्यात आला आहे. याप्रकरणी वनविभागाने वनगुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास डोंगरकठोरा वर्तुळाचे वनपाल तथा तपास अधिकारी यांच्यामार्फत नियमानुसार केला जात आहे.  सदर यशस्वी कारवाई सौरिष सहाय (उप वनसंरक्षक, यावल वन विभाग जळगाव), राजेंद्र सदगीर (विभागीय वनाधिकारी, दक्षता, धुळे) आणि समाधान पाटील (सहाय्यक वनसंरक्षक, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत महेश पाटील (वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक यावल), संजय पाटील (वनपाल, गस्ती पथक), सतीश वाघमारे (वनरक्षक), आय. बी. चव्हाण (वनरक्षक), एस. आर. तडवी (पोलीस कॉन्स्टेबल) आणि वाहन चालक शरद पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound