


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नागरिकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीतून यावल शहरातील प्रभाग क्रमांक १० आणि ११ मधील रहिवाशांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी व उपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या आरोग्यविषयक उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून शेकडो गरजू रुग्णांनी या शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे.
केतकीताई पाटील यांच्या कुशल संयोजनातून, गोदावरी फाऊंडेशनच्या तांत्रिक व वैद्यकीय सहकार्याने आणि आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक १० मधील गटनेता तथा नगरसेविका सौ. नंदाताई राजेंद्र महाजन, प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका शुभांगी येवले आणि नगरसेविका सविता नान्नवरे यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला होता.
शिबिरादरम्यान गोदावरी फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून रुग्णांच्या डोळ्यांची सखोल व मोफत मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले, त्यांना पुढील शस्त्रक्रिया व उपचारांबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी व्यंकट बारी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे आणि आरोग्यविषयक जागरूकतेमुळे गरजू, वृद्ध व सर्वसामान्य नागरिकांना घरपोच उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे.



