Home Cities जळगाव लेट-लतीफ कर्मचाऱ्यांना बसणार ‘बायोमेट्रिकचा चाप’! नशिराबाद नगरपरिषदेत फेस अटेंडन्ससह हजेरी अनिवार्य

लेट-लतीफ कर्मचाऱ्यांना बसणार ‘बायोमेट्रिकचा चाप’! नशिराबाद नगरपरिषदेत फेस अटेंडन्ससह हजेरी अनिवार्य

0
10


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेतील उपस्थिती आणि कामकाजातील शिस्त अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता नगरपरिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक तसेच फेस अटेंडन्स मशीनद्वारे हजेरी नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अचूक वेळ नोंदविली जाणार असून, कार्यालयीन शिस्तीला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषद कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या वेळेवर उपस्थितीबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. विविध कामांसाठी नगरपरिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना संबंधित कर्मचारी जागेवर उपलब्ध नसल्याचा अनुभव अनेकदा येत असल्याचे सांगण्यात येत होते. काही कर्मचारी उशिरा कार्यालयात येत असल्याच्या तसेच कार्यालयीन वेळेत बाहेर जात असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या या तक्रारींची दखल घेत कार्यालयीन शिस्त निर्माण करण्यासोबतच नागरिकांची कामे वेळेत आणि सुरळीतपणे व्हावीत, यासाठी बायोमेट्रिक व फेस अटेंडन्स प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियमितपणे लक्ष ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

नव्या हजेरी प्रणालीमध्ये कर्मचारी कार्यालयात नेमक्या किती वाजता दाखल झाले आणि किती वाजता बाहेर पडले, याची वेळ नोंदविली जाणार आहे. त्यामुळे उपस्थितीच्या नोंदीमध्ये अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असून, कार्यालयीन वेळेचे पालन करण्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये गांभीर्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे.  नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन आणि मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्या पुढाकारातून तसेच नगरपरिषद प्रशासनाच्या प्रयत्नातून ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयात आल्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचारी वेळेत उपलब्ध व्हावेत आणि त्यांच्या कामांचा वेळेत निपटारा व्हावा, हा या निर्णयामागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, उपनगराध्यक्ष पंकज महाजन तसेच नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक व फेस अटेंडन्स प्रणालीची माहिती दिली आहे. हजेरी नोंदविण्याच्या पद्धतीबाबत आवश्यक सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून, यापुढे सर्व कर्मचाऱ्यांनी या प्रणालीचा वापर करून उपस्थिती नोंदविणे बंधनकारक राहणार आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने उचललेल्या या पावलाचे नशिराबादकरांकडून समाधान व्यक्त होत आहे. नव्या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती अधिक पारदर्शकपणे नोंदविली जाणार असल्याने कार्यालयीन कामकाजात शिस्त वाढण्यास आणि नागरिकांची कामे वेळेत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound