



बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बस स्टँड परिसरातील ‘लाईव्ह ट्रेंड्स’चे पत्रकार सुरेश कोळी यांच्या कार्यालयाची भिंत तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत २० हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाचे कागदपत्रे लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून चोरट्यांनी पत्रकाराच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड केली आहे.
पत्रकार सुरेश कोळी यांच्या कार्यालयात १ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ही घरफोडी झाली. चोरट्यांनी मागील बाजूच्या दरवाज्याशेजारील भिंत फोडून आत प्रवेश केला. वकिलाची फी देण्यासाठी कार्यालयात ठेवलेली २० हजार रुपयांची रोकड आणि कार्यालयातील अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे चोरट्यांनी पळवून नेली. यानंतर उपद्रवी चोरट्यांनी पुराव्यांचा सुगावा लागू नये म्हणून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पूर्णपणे तोडफोड केली.
चोरट्यांचे धाडस एवढ्यावरच थांबले नाही, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास बाजूलाच असलेल्या ‘रॉयल चॉईस मेन्स वेअर’ या दुकानाचा मागील कडी-कोंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यापाठोपाठ ३ ऑगस्ट रोजी भरदुपारी रेणुका माता मंदिराजवळ असलेल्या राजेंद्र अग्रवाल यांच्या ‘सहेली जनरल स्टोअर्स’मध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. या दुकानातून ६० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४० हजार रुपयांचे स्टेशनरी साहित्य, असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. शहरात व संपूर्ण बोदवड तालुका परिसरात सलग तीन दिवस रात्री आणि भरदुपारी झालेल्या या चोऱ्यांमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, बोदवड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि शहरातील सुरक्षाव्यवस्था बळकट करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.



