Home प्रशासन नगरपालिका यावल शहरात घराघरातील कचरा संकलन ठप्प ; नागरिक त्रस्त

यावल शहरात घराघरातील कचरा संकलन ठप्प ; नागरिक त्रस्त

0
28


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सुरू असलेली घराघरातील कचरा संकलन सेवा गेल्या ८ ते १० दिवसांपासून बंद असल्याने शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कचरा संकलन सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी भाजपच्या नगरपालिका गटनेत्या नंदा राजेंद्र महाजन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत यावल नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील घराघरातून नियमित कचरा संकलन केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही सेवा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांकडून जमा होणारा कचरा रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत तसेच सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहे. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा अनेक दिवस साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच डास, माशा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, त्यातून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः रहिवासी भागात कचरा साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन घराघरातील कचरा संकलनाची व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा तातडीने उचलून संबंधित परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत नागरी हक्क असून, त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नंदा महाजन यांनी निवेदनात म्हटले आहे. कचरा संकलन सेवा बंद राहिल्याने निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने विलंब न करता योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

याप्रकरणी यावल नगरपालिकेचे कनिष्ठ बांधकाम अभियंता संग्राम शेळके यांना निवेदन देण्यात आले. कचरा संकलनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भाजपच्या नगरपालिका गटनेत्या नंदा राजेंद्र महाजन यांनी दिला आहे. निवेदन देताना नगरसेवक बाळू फेगडे, योगेश चौधरी, नगरसेवक रुबाब तडवी, उमेश फेगडे, कदीर खान यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound