



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘बॉटॅनिकल ब्लिट्झ – झटपट वनस्पती ओळख स्पर्धा २०२६-२७’ या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वनस्पतींची शास्त्रीय ओळख, वर्गीकरणशास्त्राचे ज्ञान आणि निरीक्षण कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.
१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता महाविद्यालयाच्या आय.सी.टी. हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत विविध वनस्पतींचे सामान्य नाव, शास्त्रीय नाव आणि कुल (Family) ओळखून सांगायचे होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महाविद्यालयातील एकूण ३१ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. इब्राहिम पिंजारी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. युसूफ पटेल यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत वनस्पतींची अचूक ओळख करून देत आपले वनस्पतीविषयक ज्ञान आणि निरीक्षण कौशल्य सिद्ध केले. स्पर्धेत पीरजादे सायमा इस्माईल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. जवेरिया शेख खलील यांनी द्वितीय, तर सिक्कलगर तहेलीम फातिमा शेख हमीद यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांमध्ये वनस्पती वर्गीकरणशास्त्र अर्थात Plant Taxonomy विषयी जागरूकता निर्माण करणे, वनस्पती ओळखण्याची क्षमता विकसित करणे तसेच वनस्पतीशास्त्र विषयाबद्दल आवड आणि उत्सुकता वाढविणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. पारंपरिक पद्धतीने केवळ पुस्तकातील ज्ञान न घेता प्रत्यक्ष वनस्पतींचे निरीक्षण करून त्यांची शास्त्रीय ओळख करण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. तन्वीर खान, डॉ. फिरदोस शेख, प्रा. उमर पठाण आणि प्रा. प्रवीण घाडगे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.



