



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या पोलिसांच्या धडक मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कारवाई करत इफेड्रिन, गांजा आणि एक मोपेड असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ५५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारियलवाला बाबा दर्ग्याच्या समोरील रस्त्यावर एका व्यक्तीकडून इफेड्रिन या पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वचन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहन काळे यांना कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या कायदेशीर परवानगीने तसेच राजपत्रित अधिकारी चंद्रकांत अरुण बोडरे आणि पंचांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.४० वाजता दर्ग्यासमोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी काळ्या रंगाच्या बर्गमन मोपेडवरून एक व्यक्ती येताना पोलिसांना दिसली. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित व्यक्तीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) असल्याचे समोर आले. पंचांसमक्ष त्याच्या ताब्यातील मोपेडच्या डिक्कीची झडती घेण्यात आली. यावेळी पांढऱ्या रंगाची स्फटिकयुक्त पावडर आणि गांजा असा अमली पदार्थांचा साठा आढळून आला. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत सदर रासायनिक पदार्थ इफेड्रिन आणि दुसरा पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रिनची अंदाजे किंमत ९ लाख ८१ हजार ५०० रुपये, तर २ किलो ११४ ग्रॅम गांजाची अंदाजे किंमत १ लाख ५ हजार ७०० रुपये आहे. याशिवाय काळ्या रंगाची बर्गमन मोपेड क्रमांक MH-19-EK-4305 जप्त करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ४ किलो ७७ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल आणि मोपेड मिळून ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. इफेड्रिनचा वापर एमडीसारख्या अमली पदार्थांच्या निर्मितीसह विविध गैरवापरासाठी होऊ शकतो. प्राथमिक चौकशीत संबंधित पदार्थाचा वापर बॉडी बिल्डिंगमध्ये वजन किंवा फॅट कमी करण्यासाठी तसेच जास्त वेळ सतर्क राहण्यासाठी केला जात असल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दाव्याची स्वतंत्र तपासणी तपास यंत्रणेकडून केली जात आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक प्रभाकर जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, दीपक जगदाळे, संतोष काशिनाथ पवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी, फॉरेन्सिक पथक, पंच, प्रमाणित वजनकाटा धारक आणि फोटोग्राफर सहभागी झाले होते. जप्त केलेल्या अमली पदार्थांचा स्रोत, त्याची वाहतूक कुठून करण्यात आली आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार करीत आहेत.



