



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महामार्गावरील सुरू असलेल्या कामांच्या नियोजनावरून आता संताप व्यक्त होत आहे. पाळधी–तरसोद बायपास अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नसताना महानगरपालिकेच्या खोटेनगरकडे जाणाऱ्या समांतर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यातच महामार्गाची आणखी एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने संपूर्ण वाहतुकीचा भार एका रस्त्यावर येत असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केला आहे.
जळगावातील सध्याची वाहतूक परिस्थिती पाहता NHAIच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक नियोजनाचा नेमका कोणता तांत्रिक अभ्यास केला आहे? असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. शहरातील वाहतुकीचे पर्याय आधीच मर्यादित असताना पर्यायी मार्ग पूर्णपणे उपलब्ध होण्यापूर्वीच महामार्गावरील मोठे काम हाती घेणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाळधी–तरसोद बायपास अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. दुसरीकडे महानगरपालिकेच्या माध्यमातून खोटेनगरकडे जाणाऱ्या समांतर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी वाहतूक मार्ग पूर्णपणे तयार नसताना महामार्गाचा एक भाग बंद करण्याच्या निर्णयामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. “कामाला आमचा विरोध नाही; मात्र कोणते काम कधी सुरू करायचे, त्यापूर्वी कोणता पर्यायी मार्ग तयार ठेवायचा आणि हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यायची, एवढे मूलभूत नियोजन प्रशासनाने करणे अपेक्षित आहे,” असे अरविंद देशमुख यांनी स्पष्ट केले. विकासकामे आवश्यक असली तरी त्यासाठी योग्य वेळ, टप्प्याटप्प्याने नियोजन आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
जळगावातील अपघातांच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, वर्षभरात सुमारे ७० नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला असून, बायपास बंद झाल्यानंतर अवघ्या २३ दिवसांत पाच जणांचा बळी गेला आहे. अशा परिस्थितीतही वाहतुकीचा भार वाढविणारे निर्णय घेतले जात असतील, तर जळगावकरांनी प्रश्न विचारायचे नाही तर काय करायचे, असा संतप्त सवाल त्यांनी केला. महामार्गावरील कामांमुळे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आधी पाळधी–तरसोद बायपास पूर्ण क्षमतेने सुरू करावा, महानगरपालिकेचा समांतर रस्ता पूर्ण होऊ द्यावा आणि सर्व पर्यायी मार्गांवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. त्यानंतरच महामार्गावरील मोठ्या कामांना सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन NHAI तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने परिस्थितीचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विकासकामे करताना नागरिकांची गैरसोय आणि जीवितहानी टाळण्यासाठी समन्वयाने निर्णय घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “जळगावकरांचा जीव हा NHAIच्या प्रयोगासाठी नाही!” अशा शब्दांत नगरसेवक अरविंद देशमुख यांनी प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



