



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्यापार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजपासून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमशेजारील पद्मालय पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानग्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांत जाण्याची गरज भासणार नाही.
या एक खिडकी केंद्रावर गणेश मंडळांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांचे अर्ज एकाच ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत. यामध्ये पोलीस विभागाची परवानगी, महानगरपालिकेची मंडप परवानगी तसेच महावितरणकडील वीज जोडणीसाठी मागणी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. गणेश मंडळांना परवानगी प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण करता यावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी शासकीय मूल्य ११८ रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह केंद्रावर अर्ज साद करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे एक खिडकी केंद्र दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. गणेशोत्सव जवळ येत असल्याने मंडळांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करून आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. गणेश मंडळांना विविध विभागांकडून परवानग्या घेताना होणारी धावपळ कमी होणार असून, एकाच ठिकाणी अर्ज स्वीकारले जाणार असल्याने वेळेचीही बचत होणार आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



