Home क्राईम केळी चोरी प्रकरणाचा फैजपूर पोलिसांकडून छडा ; फरार मुख्य आरोपीला रोख रकमेसह...

केळी चोरी प्रकरणाचा फैजपूर पोलिसांकडून छडा ; फरार मुख्य आरोपीला रोख रकमेसह अटक

0
31


फैजपूर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आमोदा शिवारातील शेतातून हजारो रुपयांचे केळीचे घड चोरून नेणाऱ्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात फैजपूर पोलिसांना मोठे यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि बँक व्यवहारांच्या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करत मुख्य सूत्रधाराकडून केळी विक्रीतून मिळालेली १५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांच्या या जलद आणि धडक कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी की, फैजपूर येथील त्रिमूर्ती चौकातील रहिवासी जितेंद्र दिनकर कोल्हे (वय ४५) यांची आमोदा गावाच्या शिवारातील गट क्रमांक २०५ मध्ये नफ्याने केलेली केळीची बाग आहे. या बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपये किमतीचे १५ क्विंटल वजन असलेले ७० ते ८० केळीचे घड चोरून नेले होते. याप्रकरणी जितेंद्र कोल्हे यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार मोती पराग पवार करत असताना त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयितांच्या बँक व्यवहारांची बारीक पाहणी केली. या तपासातून लहु अशोक केदारे, अजय सुनील केदारे, शुभम विजय केदारे व सुरज मिलिंद मोरे (सर्व रा. लुंबिनीनगर, बामणोद, ता. यावल) यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लहु अशोक केदारे हा चोरीचा प्रकार घडल्यापासून पोलिसांना चकवा देत फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी लहु केदारे हा फैजपूर शहरात येणार असल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला फैजपूर शहरातून ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांच्या सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीच्या केळीच्या विक्रीतून मिळालेल्या त्याच्या हिश्श्याची १५ हजार रुपयांची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी, सहाय्यक फौजदार मोती पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल राहुल महाजन यांच्या पथकाने पार पाडली.


Protected Content

Play sound