



रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीचे वेध लागताच रावेर तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील घडामोडींना अचानक मोठा वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांनी रावेर तालुक्यातून जिल्हा बँक निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असून, मोरगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने त्यांच्या नावाचा अधिकृत ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून आपापल्या प्रतिनिधींचे ठराव पाठविण्याची अंतिम मुदत आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध सोसायट्यांमध्ये राजकीय जुळवाजुळव आणि इच्छुकांची मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशातच शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांनी रावेर तालुक्यातून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संभाव्य उमेदवाराविरुद्ध थेट रिंगणात उतरणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडल्याने या निवडणुकीतील लढतीचे स्वरूप कमालीचे रंजक व चुरशीचे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
योगीराज पाटील हे केवळ राजकीय क्षेत्रातील अभ्यासू नेते नसून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम करताना सहकार क्षेत्रातील कामकाजाचा त्यांना मोठा आणि समृद्ध अनुभव आहे. तळागाळातील शेतकरी व सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवत त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदापर्यंत यशस्वी मजल मारली आहे. आता मोरगाव सोसायटीच्या माध्यमातून मिळालेल्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर त्यांनी जिल्हा बँकेच्या रिंगणात उतरून सहकार क्षेत्रातील आपली भूमिका अधिक प्रभावी करण्याचा निर्धार केला आहे.



