Home Cities अमळनेर निर्मल नेमाडे यांची ‘इंडो-आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या आंतरराष्ट्रीय मानद सदस्यपदी निवड

निर्मल नेमाडे यांची ‘इंडो-आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या आंतरराष्ट्रीय मानद सदस्यपदी निवड

0
17


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांसोबत निकट समन्वयाने काम करणाऱ्या आणि भारत-आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक व औद्योगिक सहकार्यासाठी कार्यरत असलेल्या ‘इंडो-आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (IACCI), मुंबई या प्रतिष्ठित संस्थेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर (International Trade Promotion Committee) मानद समिती सदस्य म्हणून अमळनेरचे भूमिपुत्र निर्मल सुधाकर नेमाडे यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती १ सप्टेंबर २०२६ पासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील नांदेड हे निर्मल नेमाडे यांचे जन्मगाव असून अमळनेर तालुक्यातील कळमसरे ही त्यांची कर्मभूमी आहे. ग्रामीण भागातून आपल्या प्रवासाची सुरुवात करून स्वतःच्या कर्तृत्वाच्या, अभ्यासाच्या आणि कौशल्याच्या बळावर एका आंतरराष्ट्रीय ख्यातनाम संस्थेच्या उच्चस्तरीय समितीवर स्थान मिळवण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी तसेच नवउद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी व अभिमानास्पद ठरत आहे.

निर्मल नेमाडे यांचे उच्चशिक्षण ‘इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स’ या विषयात झाले असून, कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी जेएनपीटी (JNPT) बंदरावर एका नामांकित इटालियन कंपनीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या त्यांची संस्था केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी तांत्रिक व धोरणात्मक सल्लागार (Strategic Consultant) म्हणून कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, लॉजिस्टिक आणि राजनैतिक संबंधांचा सखोल अभ्यास असण्यासोबतच त्यांनी आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये केलेला व्यापक प्रवास आणि तेथील बाजारपेठांचा प्रत्यक्ष अनुभव ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. हा दांडगा आंतरराष्ट्रीय अनुभव व द्विपक्षीय व्यापार संबंध दृढ करण्याप्रती असलेली त्यांची बांधिलकी लक्षात घेऊन इंडो-आफ्रिकन चेंबरने ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.

या मानद समितीच्या माध्यमातून ते भारतीय व आफ्रिकन उद्योगांमधील नवीन व्यापारी संधींचा शोध घेणे, बी-टू-बी (B2B) बैठकांचे आयोजन करणे, व्यापार शिष्टमंडळे (Trade Missions) घडवून आणणे तसेच परदेशी दूतावास, उच्चायुक्तालये आणि शासकीय संस्थांशी थेट समन्वय साधून परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सक्रिय योगदान देणार आहेत. चेंबरच्या सरचिटणीसांनी नियुक्तीपत्रात व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, नेमाडे यांचा व्यावसायिक अनुभव, जागतिक भ्रमंतीतून मिळालेली आंतरराष्ट्रीय दृष्टी आणि भारत-आफ्रिका व्यापारी संबंध बळकट करण्याप्रती असलेली निष्ठा संस्थेच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी मोलाची ठरणार आहे.

आपल्या या निवडीवर आनंद व्यक्त करताना निर्मल नेमाडे यांनी स्थानिक विकासाला प्राधान्य देण्याचा संकल्प सोडला आहे. “या आंतरराष्ट्रीय संधीचा उपयोग प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील नवउद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी करायचा आहे. जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादने, प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण भागातील उदयोन्मुख व्यावसायिकांना थेट जागतिक विशेषतः आफ्रिकन बाजारपेठेची कवाडे खुली करून देऊन या संधीचे सोने करण्याचा माझा मानस आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.


Protected Content

Play sound