Home धर्म-समाज जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात

जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात

0
19


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । न्हावी मार्गावरील जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि संरक्षणाच्या पवित्र नात्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देत या कार्यक्रमातून बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पायल खंडाळे यांच्या भाषणाने झाली. त्यांनी भारतीय संस्कृतीतील विविध सणांचे महत्त्व सांगताना रक्षाबंधनाचे स्थान विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून परस्परांप्रती असलेली जबाबदारी, प्रेम, विश्वास आणि संरक्षणाची भावना जपण्याचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. रक्षाबंधन सणाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रसंगांच्या माध्यमातून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध प्रसंगांचे सादरीकरण करत रक्षाबंधनाच्या परंपरेमागील भावना प्रभावीपणे उलगडून दाखवल्या. द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्या रक्षाबंधनाच्या प्रसंगाचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. तसेच राजा बळी आणि देवी लक्ष्मी यांच्या बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचे वर्णन करण्यात आले. यासोबतच राणी कर्णावती आणि हुमायू यांच्या ऐतिहासिक रक्षाबंधनाच्या प्रसंगाचेही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या प्रसंगातून धर्म, जात किंवा भेदाभेदापलीकडे जाऊन बंधुभाव, मानवता आणि संरक्षणाची भावना जपण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

शाळेचे मुख्याध्यापक मोसेस जाधव यांनी मार्गदर्शनपर भाषणातून रक्षाबंधन हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित असलेला सण नसून मानवता, प्रेम आणि बंधुत्व जपणारा सण असल्याचे सांगितले. रोजच्या परिपाठातील प्रतिज्ञेची आठवण करून देताना आपण सर्व भारतमातेची मुले आहोत आणि या नात्याने एकमेकांचे बंधू-भगिनी आहोत, ही भावना विद्यार्थ्यांनी मनात रुजवावी, असे आवाहन त्यांनी केले. कला शिक्षिका वैशाली किरंगे यांनी फलकलेखनाच्या माध्यमातून ‘वाईट विचारांचा त्याग करा’ हा प्रेरणादायी संदेश दिला. चांगले विचार, सद्वर्तन, सकारात्मक दृष्टिकोन आणि संस्कार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने केवळ उत्सव साजरा न करता चांगल्या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यामिनी लोखंडे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी अंकिता चौधरी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य मोसेस जाधव तसेच पर्यवेक्षिका पूनम नेहेते यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंददायी तसेच संस्मरणीय ठरला.


Protected Content

Play sound