Home Cities अमळनेर अमळनेरच्या अमृताची वर्ल्डकप भरारी! भारतीय अंडर-15 क्रिकेट संघात महाराष्ट्रातून एकमेव निवड

अमळनेरच्या अमृताची वर्ल्डकप भरारी! भारतीय अंडर-15 क्रिकेट संघात महाराष्ट्रातून एकमेव निवड

0
9


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली असून, येथील सुप्रसिद्ध उद्योजक आर.के. पटेल परिवारातील सुकन्या दियाना उर्फ अमृता पाटील हिची अंडर-15 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून भारतीय संघात स्थान मिळविणारी अमृता ही एकमेव खेळाडू ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेत 21 सप्टेंबरपासून रंगणाऱ्या या वर्ल्डकप स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

अमृता ही अमळनेर येथील मुंदडा ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच गेल्या तीन वर्षांपासून ती क्रिकेटचा नियमित सराव करीत आहे. सातत्यपूर्ण मेहनत, सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वर्गीय उद्योजक आर.के. दादा पाटील यांची पणती, उद्योजक विनोदभैय्या पाटील व वसंत बापू पाटील यांची नात तसेच मितेश पाटील व मोनाली मितेश पाटील यांची कन्या म्हणून तिची ओळख आहे.

क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जळगाव येथे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील अंडर-15 वयोगटातील अनेक प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अमृताने दमदार कामगिरी करत आपल्या फलंदाजीसह विकेटकीपिंगमध्येही प्रभावी प्रदर्शन केले. तिच्या उत्कृष्ट खेळीची दखल घेत तिची दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या अंडर-15 इंडोअर क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली. महाराष्ट्रातून या संघात निवड झालेली ती एकमेव खेळाडू असल्याने अमळनेरसह संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यापूर्वी धुळे येथे झालेल्या अंडर-19 बॉईज क्रिकेट सिरीजमध्येही अमृताने उल्लेखनीय कामगिरी केली होती. या स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत तिने ‘मॅन ऑफ द सिरीज’चा बहुमान पटकावला होता. विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत तिने आपल्या गुणवत्तेची प्रचिती दिली आहे.

अमृताच्या क्रिकेट कारकिर्दीत प्रशिक्षक मिलिंद शिंदे आणि रोनक शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आगामी वर्ल्डकपच्या तयारीसाठी अमृता 10 सप्टेंबरपासून बंगळुरू येथे विशेष सरावासाठी जाणार आहे. त्यानंतर 21 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत सुरू होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी ती भारतीय संघासोबत रवाना होणार आहे. त्यामुळे अमळनेरच्या या युवा क्रिकेटपटूच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

अमृताच्या भारतीय संघातील निवडीबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे तिचे अभिनंदन करून कौतुक व सत्कार केला. तसेच खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील आणि मुंदडा ग्लोबल स्कूलचे चेअरमन ओमप्रकाश मुंदडा यांनी अमृता तसेच तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound