


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्रावण महिन्यानिमित्त जळगाव तालुक्यातील कंडारी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कावड यात्रेला जिल्हा परिषद सदस्य प्रताप भाऊ पाटील यांनी सदिच्छा भेट देत कावडधारी भाविकांचा उत्साह वाढवला. मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात निघालेल्या या यात्रेत भाविकांची मोठी उपस्थिती होती.
कंडारी येथील बजरंग चौकातील हनुमान मंदिरापासून कावड यात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीने कावड घेऊन मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी प्रताप भाऊ पाटील यांनी कावडधारी भाविकांशी संवाद साधत त्यांचे उत्साहवर्धन केले. यानंतर प्रताप भाऊ पाटील यांनी उमाळा येथील आद्य श्री स्वयंभू उमामहेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील धार्मिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. कावड यात्रेचे नियोजन आणि आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
प्रताप भाऊ पाटील यांच्या भेटीमुळे कावडधारी भाविक, आयोजक तसेच ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यात्रेदरम्यान महिला मंडळासह गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला प्रताप भाऊ पाटील यांच्यासह नंदकुमार देशमुख, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रविण परदेशी, राजेंद्र देशमुख, हर्षल बाविस्कर, शैलेश पवार, रंजीत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने महिला मंडळाच्या सदस्या, भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



