
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात येत्या २६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ईद-ए-मिलाद जुलूसाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या वतीने नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जुलूसाच्या आयोजनासह कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

येत्या २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता अमरदीप टॉकीज चौकातून ईद-ए-मिलादचा जुलूस काढण्यात येणार आहे. जुलूसाचा मार्ग, सहभागी नागरिकांची व्यवस्था तसेच शांततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जुलूसाच्या आयोजनासाठी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. जुलूसादरम्यान शिस्त आणि शांतता राखण्यासोबतच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला आजी-माजी नगरसेवक, समाजसेवक तसेच मुस्लिम समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. आगामी ईद-ए-मिलाद जुलूस शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, जुलूसात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शहरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ईद-ए-मिलाद समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



