
वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहर व परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पाण्याअभावी अनेक पिके करपून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, पुढील परिस्थितीचा सामना कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सरकारने तातडीने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

.नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक नाना चौधरी, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक, प्रसिद्ध कृषीमित्र मिलिंद भैसे, फझल शेख, अजमल भाई, आकाश निमकर, भोजराज पालवे, शामराव धनगर, कुंदन माळी, तेजस जैन, बळीराम दादा सोनवणे, प्रकाश गव्हाळे, अशफाक खाटीक आदींनी वरणगाव परिसरातील शेतशिवारात फेरफटका मारून पिकांची पाहणी केली. पावसाअभावी शेतातील उभी पिके जळून गेल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिकांची लागवड केली होती. मात्र, पावसाने वेळेवर साथ न दिल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळाले नाही. परिणामी पिकांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पिके पूर्णपणे करपल्याचे चित्र आहे. पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडला आहे. शेतीसाठी केलेला खर्च, बियाणे, खते, औषधफवारणी आणि मशागतीचा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, पुढील हंगामासाठी आर्थिक नियोजन कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सरकारने तातडीने कृत्रिम पावसासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष मदत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, अशी अपेक्षा नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये आणि संकटाच्या काळात त्यांचे मनोबल वाढावे, यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ‘वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर’ हे संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत असून, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही सुनील काळे यांनी सांगितले. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक आधार देणे गरजेचे असून, प्रशासनानेही तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याची आवश्यकता आहे.



