रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील सबस्टेशनजवळील शेतकऱ्यांच्या वाड्यातून चोरीस गेलेल्या ६६ हजार रुपये किमतीच्या चार गायींच्या चोरीचा निंभोरा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज, आधुनिक तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चार संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या जलद आणि धडक कारवाईमुळे परिसरातील बळीराजासह नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
निंभोरा बुद्रुक शिवारात सबस्टेशनजवळ स्थानिक शेतकरी लक्ष्मण गोविंदा बोढे (वय ६५) आणि सुपडू विश्वनाथ नेमाडे यांचे गुरे बांधण्याचे वाडे आहेत. २९ तारखेच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी या वाड्यांना लक्ष्य करत बोढे यांच्या दोन आणि नेमाडे यांच्या दोन अशा एकूण ६६ हजार रुपये किमतीच्या चार दुभत्या गायी चोरून नेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र गायींचा कुठेही सुगावा न लागल्याने अखेर त्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली होती.

शेतकऱ्यांच्या पशुधनाची चोरी झाल्याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळासह परिसरातील मुख्य रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित हालचाली टिपत आणि खबऱ्यांच्या जाळ्याचा प्रभावी वापर करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत या चोरीचा उलगडा केला.
या धाडसी कारवाईत निंभोरा पोलिसांनी शेख मासून मन्यार (वय २५, रा. मन्यारवाडा, चिनावल), शेख आवेश शेख एजाज खान (वय २०, रा. ख्वाजानगर, सावदा), शेख राजीद शेख शरीफ (वय २३, रा. ईदगाहजवळ, रसलपूर) आणि शेख नासीर शेख चांद (वय ४५, रा. वरणगाव, ता. भुसावळ) या चारही संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेऊन अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल किरण कोळी यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली असून, निंभोरा पोलिसांच्या या धडक कामगिरीचे संपूर्ण रावेर तालुक्यात कौतुक होत आहे.



