यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील उंटावद येथील रहिवासी तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे कार्यरत असलेले अविनाश चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक वेतनिक पुरस्कार २०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे उंटावदसह यावल तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत शैक्षणिक प्रशासन आणि सेवा क्षेत्रात लोकाभिमुख वृत्तीने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. याच अंतर्गत अविनाश चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची दैनिक वेतनिक पुरस्कार २०२५ साठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पाटील यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश व्ही. गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. योगेश पाटील यांच्यासह सौ. इंदुबाई चंद्रकांत पाटील, प्रशांत प्रमोद पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठातील आपल्या सेवाकाळात अविनाश पाटील यांनी शैक्षणिक प्रशासन तसेच सेवा क्षेत्रात जबाबदारीने काम करत लोकाभिमुख दृष्टिकोनातून योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विद्यापीठाकडून मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव मानला जात आहे. दैनिक वेतनिक पुरस्कार २०२५ मिळाल्याबद्दल अविनाश चंद्रकांत पाटील यांचे उंटावद तसेच यावल तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे उंटावदच्या शैक्षणिक क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



