Home Cities एरंडोल लक्ष्य फाउंडेशनची शेतकऱ्यांना मोठी मदत ; हजारो शेतकऱ्यांना मोफत इलेक्ट्रिक कृषी फवारणी...

लक्ष्य फाउंडेशनची शेतकऱ्यांना मोठी मदत ; हजारो शेतकऱ्यांना मोफत इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप

0
7

एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील विखरण येथे लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने गरजू शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विखरण तसेच पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांना मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. स्मिताताई वाघ होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि संतशिरोमणी श्री. सावता माळी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. लक्ष्य फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रोशनजी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते किशोरजी आहिरे (चाकण, पुणे) यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासह सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पारदर्शक आणि योग्य पद्धतीने पोहोचविण्यासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. खासदार सौ. स्मिताताई वाघ यांनी लक्ष्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे यावेळी कौतुक केले. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रोशनजी मराठे आणि त्यांचे सहकारी सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. खानदेशातील शेतकरी, रुग्ण, दिव्यांग आणि समाजातील इतर गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यासोबतच सीएसआरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचे कार्य फाउंडेशन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

एरंडोल नगरीचे भूमिपुत्र असलेल्या रोशनजी मराठे यांनी पुण्यासारख्या शहरात उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवतानाही आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते करीत असलेले कार्य गौरवास्पद असल्याचे खासदार स्मिताताई वाघ यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमासाठी डॉ. युवराज येडुरे, अध्यक्ष, महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या विशेष सहकार्यातून सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधने उपलब्ध करून देण्यात आली. इलेक्ट्रिक फवारणी पंपामुळे शेतीतील फवारणीचे काम अधिक सुलभ होऊन शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचण्यास मदत होणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाला नायब तहसीलदार अमोल बन, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, विखरणचे सरपंच गोपाल महाजन, उद्योजक आनंदराव चौथे, डॉ. धनंजय बेंद्रे, ह.भ.प. संजय जमादार, उद्योजक समाधानभाऊ पाटील, उद्योजक बाळासाहेब मोझे, उद्योजक विष्णुआप्पा बाळदे, सुभाष गुंजाळ, खडकेचे सरपंच दीपक राजपूत, माजी सरपंच खंडूभाऊ गवळी, भाजपा तालुका उपाध्यक्ष दीपक राजपूत, उद्योजक गणेश बडगुजर, पिंपळकोठ्याचे माजी सरपंच दीपक म्हासाळ, बहादरपूरचे माजी सरपंच सोमनाथ चौधरी, आरोग्यदूत पितांबर भावसार, मनोज दादा पेले, उमेशभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथील आदर्श सरपंच रमेश काशिनाथ सौंदाणे आणि बहादरपूर येथील समाजसेवक राकेशजी गुरव यांचीही विशेष उपस्थिती होती. माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांनीही लक्ष्य फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. युवक, दिव्यांग, रुग्ण तसेच शेतकरी अशा समाजातील विविध घटकांसाठी रोशनजी मराठे सातत्याने कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याच्या भावनेतून ते समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनीही शेतकऱ्यांना मोफत इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंप उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आधुनिक कृषी साधने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. विखरण, एरंडोल तालुका तसेच पंचक्रोशीतील गरजू शेतकऱ्यांची योग्य निकषांच्या आधारे निवड करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना कोणताही आर्थिक भार न देता स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंप देण्यात आले. वितरणाची प्रक्रिया शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडण्यासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमाचे मुख्य नियोजन उद्योजक राकेशजी मराठे तसेच लक्ष्य फाउंडेशनच्या सर्व कार्यसेवकांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश मराठे, हर्षल पाटील, सम्राट राजपूत, धीरज पाटील, कार्तिक ठाकूर, लोकेश पाटील, निखिल चौधरी, गोरख पाटील, मनोज सोनवणे, सुनील पाटील, सौरभ पाटील, करण पाटील, सुमित मराठे, संदीप पाटील, विनय महाजन, गणेश महाजन आणि बाला राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले. आधुनिक कृषी साधने मिळाल्याने शेतकऱ्यांच्या कामाचा वेग वाढण्यासोबतच फवारणीसाठी लागणारा वेळ, श्रम आणि खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे. हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत उपक्रमाला प्रतिसाद दिला असून, लाभार्थी शेतकऱ्यांकडून लक्ष्य फाउंडेशन, सीएसआर सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले.


Protected Content

Play sound