Home Cities पारोळा शिवरे ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी करणी सेनेचे आक्रमक पाऊल

शिवरे ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी करणी सेनेचे आक्रमक पाऊल

0
21

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवरे दिगर येथील ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्या मृत्यू प्रकरणाला आता सामाजिक संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे नवे वळण मिळाले आहे. ग्रामसभेदरम्यान त्यांचा मानसिक छळ, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आल्याने त्यांची प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याचा आरोप करत श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि ग्रामसेवक संघटनेने पारोळा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनानुसार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता शिवरे दिगर येथे शासनाच्या नियमानुसार ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. प्रशासक तथा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांनी उपस्थितांनी विचारलेल्या विविध हिशोब आणि कामकाजासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, काही जणांनी मागील १५ वर्षांच्या हिशोबाची मागणी केल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

पी. एन. पाटील यांनी आपण चार ते पाच महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला असून, मागील कालावधीतील हिशोब व खर्चाची संपूर्ण माहिती आपल्याकडे नसल्याचे संबंधितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मागील आर्थिक व्यवहारांची माहिती हवी असल्यास नियमानुसार अर्ज करून ती प्राप्त करता येईल, असेही त्यांनी सांगितल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, यानंतर श्याम प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर बापू पाटील, राहुल वाल्मीक कांडेकर, ज्ञानेश्वर अशोक पाटील, राहुल सरदार आणि गोरख सयाजी पाटील यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मारण्यासाठी अंगावर धावून येत धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. या प्रकारामुळे पी. एन. पाटील घाबरले आणि त्यांना घाम येऊ लागल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील काही नागरिक आणि पोलीस पाटील यांनी पी. एन. पाटील यांना ग्रामसभेतून बाहेर काढून वाहनातून गावाबाहेर नेले. मात्र, संबंधित व्यक्तींनी त्यांचा पाठलाग सुरू केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती पी. एन. पाटील यांनी फोनद्वारे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना पारोळा येथील डॉ. खरे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे नेण्याचा सल्ला दिला. धुळ्याकडे जात असताना विंचखेडे गावाजवळ त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

या घटनेनंतर श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि ग्रामसेवक संघटनेने पोलिसांकडे संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब हिलाल राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदीप रामचंद्र राजपूत, रूपेश पांडुरंग राजपूत, योगेश विजय राजपूत, अक्षयसिंग विठ्ठल राजपूत, सोनुसिंग बाळू राजपूत, प्रवीण अशोक राजपूत, अक्षय कौतिक राजपूत, सागर गोपाल राजपूत, रामचंद्र महादू राजपूत, प्रवीण पाटील, योगेश पाटील, मायाराम पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound