अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (AADM) आणि पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार व सीपीआरचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका अनुरूपा अभिजीत भांडारकर होत्या. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. सागराज चव्हाण, प्रा. डॉ. अस्मिता सर्वया, प्रा. डॉ. भरत खंडागळे आणि ग्रंथपाल उदय महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात नंदुरबार येथील आशिष वाणी यांनी ‘आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर धुळे येथील डॉ. धनश्री साळुंखे यांनी प्रथमोपचार व CPCR चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. यामध्ये अचानक उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितींवर कसे नियंत्रण मिळवावे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रात्यक्षिक सत्रात रक्तस्त्राव थांबविणे, भाजणे, फ्रॅक्चर, विजेचा धक्का बसल्यास करायचे उपाय, सीपीआर, बचाव तंत्रज्ञान, तात्पुरते स्ट्रेचर तयार करणे, दोरीच्या विविध गाठी बांधणे, अग्निशमन आणि सुरक्षित स्थलांतर यांसारख्या जीवनरक्षक घटकांचे सूक्ष्म धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.
हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींना ‘डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर’ (DMV) म्हणून अधिकृत ओळख मिळणार असून, त्यांना प्रमाणपत्रे देखील वितरीत करण्यात आली. हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असून भविष्यात सर्वसामान्य नागरिकांनाही यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सदर प्रशिक्षणाचे यशस्वी संयोजन प्रा. डॉ. अनिता खेडकर व प्रा. धनराज ढगे यांनी केले. त्यांना ज्योती सोनार, कोमल सूर्यवंशी आणि महेश शेलार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमात विद्यार्थी व प्राध्यापक मिळून एकूण ६५ जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वसंतसिंह बापू पाटील, डॉ. संजीवसिंह चव्हाण, डॉ. अंजली वीरा चव्हाण, स्वप्नीलसिंह मोरे, प्रशांतसिंह लगरे व मोनाली वीरा पाटील यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या सहकार्याने ६५ विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी विनामूल्य आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर म्हणून घोषित करण्यात आले.



