धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने धरणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च व कनिष्ठ महाविद्यालयातील रेड रिबन क्लब, आयसीटीसी विभाग, ग्रामीण रुग्णालय धरणगाव आणि साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी मानसिक आरोग्य, नशामुक्ती तसेच एचआयव्ही-एड्सविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात युवकांना निरोगी जीवनशैली, व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व आणि एचआयव्ही-एड्ससह लैंगिक संक्रमित आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य एन. डी. वळवी, राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लबचे प्रमुख डॉ. श्रीपाद उपासनी, एनएसएस महिला प्रतिनिधी प्रा. डॉ. ज्योती महाजन, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दीपक साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मयूर जैन यांनी शारीरिक व मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता, अमली पदार्थांचे सेवन तसेच त्याचे शरीर आणि मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. व्यसनाची सुरुवात टाळणे, मानसिक तणावावर योग्य पद्धतीने मात करणे आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आयसीटीसी विभागाचे समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी यांनी एचआयव्ही-एड्स, लैंगिक संक्रमित आजार, सुरक्षित वर्तन, एचआयव्ही तपासणी आणि उपचार याबाबत माहिती दिली. एचआयव्हीविषयी असलेले गैरसमज दूर करून योग्य माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरकेएसके समुपदेशक गणेश कुंभार यांनी किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यविषयक सवयी, सकस आहार आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. किशोरवयात योग्य आहार, नियमित व्यायाम, स्वच्छतेच्या सवयी आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेश्वर काकडे, प्रवीण पाटील, महाविद्यालयातील शिक्षकवृंद, एनएसएसचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही-एड्स, लैंगिक संक्रमित आजार, अमली पदार्थांचे व्यसन आणि मानसिक आरोग्य याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एचआयव्ही-एड्स प्रतिबंध, नशामुक्त जीवन आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत शपथ घेतली. युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून समाजातही आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



