Home क्राईम स्वातंत्र्य दिनी ‘ड्राय डे’चा भंग; पाचोरा रोडवर बनावट देशी दारूची वाहतूक उधळली,...

स्वातंत्र्य दिनी ‘ड्राय डे’चा भंग; पाचोरा रोडवर बनावट देशी दारूची वाहतूक उधळली, ११.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
13

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यात ‘ड्राय डे’ असताना अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. पाचोरा परिसरातील खरखेडी शिवारात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत बनावट देशी दारूसह टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार आणि चार मोबाईल संच असा एकूण सुमारे ११ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक जळगावला दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, खरखेडी शिवार, पाचोरा रोड, पाचोरा परिसरात एक पांढऱ्या रंगाची टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा चारचाकी कारमधून अवैध मद्याची वाहतूक करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने संशयित वाहनाचा शोध घेतला. एमएच ११ सीएच १७०९ क्रमांकाची इनोव्हा क्रिस्टा कार संशयास्पदरीत्या आढळून आल्यानंतर ती थांबवून चालकाकडे चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान चालकाने समाधानकारक माहिती न दिल्याने पथकाला संशय बळावला. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बनावट देशी दारूचा साठा आढळून आला. तपासणीत बनावट देशी मद्याचे २५ बॉक्स जप्त करण्यात आले. त्यासोबत चार मोबाईल संच आणि अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार असा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला.

या कारवाईत अरुण राजू तडवी (वय २९, रा. लोहार बु., ता. पाचोरा, जि. जळगाव), अनिल खंडू भुई (वय ५२, रा. खरखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव), मुकेश सुभाष कळी (वय ३०, रा. पिंपळा, ता. जि. जळगाव) आणि अनिल शिवराम महाजन (वय ४४, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यात मद्यविक्री व मद्य वाहतुकीवर निर्बंध असताना हा अवैध साठा वाहून नेला जात असल्याचे कारवाईत समोर आले. या प्रकरणी गुन्हा क्रमांक २७८/२०२६, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी नोंद करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ११ लाख ४५ हजार रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

ही कारवाई महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क,आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, , उषा वर्मा मंडळ, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगावचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Protected Content

Play sound