Home क्राईम पहुर पोलिसांची मोठी कारवाई ; मोटारसायकल चोरीतील आरोपी अटकेत, दोन दुचाकी हस्तगत

पहुर पोलिसांची मोठी कारवाई ; मोटारसायकल चोरीतील आरोपी अटकेत, दोन दुचाकी हस्तगत

0
8

पहुर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला यश आले आहे. पहुर पोलीस स्टेशनच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या दोन्ही दुचाकींची एकूण किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे.

जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव अशोक नातेकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा विभाग बापू रोहोम यांनी पहुर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पहुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आकाश सुभाष गुजर (वय २८ वर्षे, रा. नांदनखेडा, ता. जामनेर) यास ताब्यात घेतले.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये हिरो फॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक MH-19-BV-8899, अंदाजे १५ हजार रुपये किमतीची, तसेच हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH-19-DK-4013, अंदाजे २५ हजार रुपये किमतीची, अशा दोन दुचाकींचा समावेश आहे. दोन्ही मोटारसायकलींची एकूण अंदाजे किंमत ४० हजार रुपये असून, चोरीच्या वाहनांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नातेकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दरातरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोहेकॉ. सचिन चौधरी, पोहेकॉ. राहुल पाटील, पोना. दीपक पाटील, पोकॉ. ईश्वर कोकणे, पोकॉ. सत्यवान कोळी, पोहेकॉ. विकास गायकवाड तसेच चालक पोहेकॉ. हेमंत सोनवणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास पुढे सरकला असून, आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपासही पोलीस करत आहेत. दरम्यान, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना. दीपक पाटील करीत आहेत.


Protected Content

Play sound