Home धर्म-समाज १ लाख ५१ हजार १११ मोदकांचा महानैवेद्य ; महाराष्ट्रातील ५१ केंद्रांतून प्रसाद...

१ लाख ५१ हजार १११ मोदकांचा महानैवेद्य ; महाराष्ट्रातील ५१ केंद्रांतून प्रसाद निर्मिती, खामगावातून भाविकांना वितरण

0
10

खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीनंतर शेगावकडे मार्गक्रमण करत असताना खामगाव येथे दाखल होणार आहे. पालखीचा हा अंतिम मुक्काम असल्याने खामगावात वारकरी आणि पालखीचे भव्य स्वागत करण्यात येणार असून, यानिमित्ताने तब्बल १ लाख ५१ हजार १११ मोदकांचा महानैवेद्य तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध ५१ केंद्रांवरून तयार करण्यात आलेला हा प्रसाद खामगाव येथील मुख्य केंद्रातून भाविकांना वितरित केला जाणार आहे.

खामगाव शहरातील आदर्शनगर परिसरातील श्री गजानन महाराज उपासना परिवार महिला मंडळाच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांपासून हा अनोखा धार्मिक उपक्रम राबविला जात आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे खामगावात आगमन होत असल्याने भक्तिमय वातावरणात या महानैवेद्याची तयारी करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील तब्बल ५१ केंद्रांमधून मोदक तयार करण्यात आले आहेत. अमरावती, अकोट, पुणे, कोल्हापूर, जळगाव, खान्देश, चंद्रपूर, संभाजीनगर यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मोदकांचा प्रसाद खामगाव येथे संकलित करण्यात आला आहे. संपूर्ण प्रसाद भाविकांच्या वितरणासाठी तयार असून, पालखीच्या स्वागतादरम्यान भाविकांना हा प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. श्रींच्या पालखीचा खामगावातील मुक्काम हा भाविकांसाठी श्रद्धेचा आणि उत्साहाचा क्षण मानला जातो. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आणि भक्तांचे स्वागत करण्यासाठी विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ लाख ५१ हजार १११ मोदकांचा महानैवेद्य हा विशेष उपक्रम भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विविध भागांतील गजानन भक्त एकत्र येत असून, भक्ती आणि सेवाभावाचा आध्यात्मिक धागा अधिक मजबूत होत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. विविध केंद्रांवरून तयार होणारा प्रसाद एकाच ठिकाणी संकलित करून तो भाविकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी खामगावात दाखल होत असताना होणारे स्वागत, वारकऱ्यांची उपस्थिती आणि मोदकांच्या महानैवेद्याचे वितरण यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या या महानैवेद्यानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात येणार असून, हजारो भक्त या सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound