Home Cities मुक्ताईनगर ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणी रोहिणी खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणी रोहिणी खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
16

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जीवंत धामण साप हाताने पकडण्याच्या प्रकरणात रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत टोंगे यांनी केली आहे. मुक्ताईनगर येथील शेतातून जिवंत धामण साप हाताने पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणाला आता कायदेशीर वादाचे व स्वरूप प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी एकनाथ खडसे यांनी १२ ऑगस्ट रोजी सोशल मीडिया खात्यावर हा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्याविरोधात मुक्ताईनगर नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत अशोक टोंगे यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक, वनविभाग तसेच पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत संबंधित व्हिडिओची सखोल चौकशी करून, वन्यजीव संरक्षण कायद्यातील लागू तरतुदींनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये रोहिणी खडसे या मोठ्या आकाराच्या जिवंत धामण सापाला हाताने पकडताना दिसत आहेत. साप हाताळताना सुरक्षित व वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला नसल्याचा तसेच सापाच्या मानेजवळ किंवा शरीरावर कथितपणे दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सापाला इजा झाली आहे का किंवा त्याला अनावश्यक त्रास झाला आहे का, याची वनविभागाने वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. व्हिडिओ तयार केल्यानंतर संबंधित सापाचे काय झाले, याबाबतही तक्रारदाराने प्रश्न उपस्थित केला आहे. सापाला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याचा पुरावा किंवा वनविभागाच्या नोंदी उपलब्ध आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

साप सध्या जिवंत असून सुरक्षित आहे का, त्याला कोणतीही इजा झाली का आणि त्याला नेमक्या कोणत्या ठिकाणी सोडण्यात आले, याची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रारीत वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मधील कलम ९, ३९, ४८-अ व ५१ तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० मधील कलम ११ यांचा संदर्भ देण्यात आला आहे. मात्र, संबंधित सापाची प्रजाती, त्याला लागू असलेले कायदेशीर संरक्षण, प्रत्यक्ष परिस्थिती आणि नेमकी कोणती कलमे लागू होतात, याची खातरजमा तपास यंत्रणेने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित सोशल मीडिया व्हिडिओची लिंक, स्क्रीनशॉट तसेच व्हिडिओची प्रत पेनड्राइव्हमध्ये तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. हा व्हिडिओ डिजिटल पुरावा म्हणून सुरक्षित ठेवून त्याचा मूळ अपलोड, तारीख व वेळ, संबंधित खाते, व्हिडिओची सत्यता, घटनास्थळ आणि व्हिडिओनंतर सापाची झालेली स्थिती याबाबत तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वन्यजीवाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःहून दखल घेतली का, व्हिडिओची पाहणी केली का आणि प्राथमिक चौकशी केली का, याचीही तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर झाल्याचे चौकशीत आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही तक्रारदाराने केली आहे. रोहिणी खडसे या प्रमुख राजकीय पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर प्रसारित झालेल्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळू शकते. त्यामुळे नागरिक आणि विशेषतः तरुणांमध्ये साप स्वतः पकडणे किंवा त्यांच्याशी अशा प्रकारे स्टंट करणे योग्य असल्याचा चुकीचा संदेश जाऊ शकतो, असा आक्षेप तक्रारदाराने घेतला आहे. प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन्यजीव विभागाच्या मदतीशिवाय साप पकडण्याचा प्रयत्न केल्यास सापासोबतच संबंधित व्यक्तीच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची कोणताही राजकीय दबाव अथवा व्यक्तीचा दर्जा न पाहता निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे या प्रकरणातून स्पष्ट व्हावे, अशी अपेक्षा नगरसेवक प्रशांत अशोक टोंगे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित व्यक्ती तसेच व्हिडिओमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची चौकशी करून, तपासात दोष आढळल्यास लागू असलेल्या वन्यजीव संरक्षण व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, तक्रारीतील आरोपांची सत्यता अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार असून, संबंधित व्हिडिओची संपूर्ण पार्श्वभूमी, सापाची सद्यस्थिती, त्याला कुठे सोडण्यात आले आणि तो नेमक्या कोणत्या पद्धतीने हाताळण्यात आला, याबाबत वनविभागाच्या चौकशीकडे आता लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound