Home क्राईम सावदा पोलिस ठाण्यात सावकारीच्या त्रासातून आत्महत्येप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा ; ४८ वर्षीय व्यक्तीचा...

सावदा पोलिस ठाण्यात सावकारीच्या त्रासातून आत्महत्येप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा ; ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

0
36

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रोझोदा येथे सावकारीच्या पैशांचा तगादा आणि कथित मानसिक त्रासाला कंटाळून ४८ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यशवंत भानुदास ठाकुर यांनी ११ ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या मृत्यूनंतर घरात आढळलेल्या चिठ्ठीच्या आधारे आणि मुलगा दुष्यंत यशवंत ठाकुर यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता दुष्यंत ठाकुर आणि त्यांची आई बेकरी बंद करून घरी परतले. त्यावेळी घरातील स्वयंपाकघरात यशवंत ठाकुर हे छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खाली उतरवून रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता घरात एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत आर्थिक अडचणी, कर्जाचे व्याज आणि संबंधित व्यक्तींकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या चिठ्ठीच्या आधारेही पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, रोझोदा येथील राहूल नामदेव लिधुरे यांच्याकडून यशवंत ठाकुर यांनी २ लाख रुपये घेतले होते. तर फैजपूर येथील धर्मेंद्र तलरेजा यांच्याकडून ६ लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कर्जाच्या बदल्यात अनुक्रमे ४ लाख ५० हजार रुपये आणि ९ लाख रुपये व्याज म्हणून दिल्याचा दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे.

कर्जाची रक्कम आणि व्याज दिल्यानंतरही संबंधितांकडून आणखी व्याजासाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय बेकरीमध्ये ग्राहकांसमोर व्याजाच्या पैशांची मागणी करून जातीवाचक शिवीगाळ आणि अपमान केला जात असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे यशवंत ठाकुर मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते, असा दावाही करण्यात आला आहे.  या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ACP नंदराज दिनकरराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलिसांकडून विविध बाबींची चौकशी सुरू आहे. चिठ्ठीतील मजकूर, कर्जाचे व्यवहार, व्याजाची रक्कम तसेच तक्रारीत करण्यात आलेले मानसिक त्रास व अपमानाचे आरोप याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound