Home Cities जळगाव उद्या जळगाव दूध संघात विशेष सोहळा; जे. टी. महाजन स्मारक व सांडपाणी...

उद्या जळगाव दूध संघात विशेष सोहळा; जे. टी. महाजन स्मारक व सांडपाणी प्रकल्पाचे लोकार्पण

0
13

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादितच्या वतीने गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी दूध संघाच्या प्रांगणात विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये दूध संघाचे संस्थापक चेअरमन व माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे लोकार्पण, नूतनीकरण केलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन तसेच मुख्य दुग्धशाळेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आधुनिकीकरण व वाढीव क्षमतेच्या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे.

गुरुवारी सकाळी ११ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रमुख उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. दूध संघाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमांमुळे शेतकरी, दूध उत्पादक सभासद तसेच दुग्ध व्यवसायाशी संबंधित घटकांना विविध सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून दूध संघाचे संस्थापक चेअरमन आणि माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. या स्मारकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण लोकार्पण करण्यात येणार आहे. दूध संघाच्या उभारणीत आणि वाटचालीत योगदान देणाऱ्या संस्थापकांच्या कार्याची आठवण या स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणार आहे.

याच कार्यक्रमात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय, पशुपालन, दूध उत्पादनातील आधुनिक पद्धती आणि संबंधित विषयांवर प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.

मुख्य दुग्धशाळेतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून त्याची क्षमता वाढविण्यात आली आहे. या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आधुनिकीकरण व वाढीव क्षमता प्रकल्पाचे उद्घाटनही यावेळी होणार आहे. पर्यावरणपूरक दुग्ध प्रक्रिया आणि सांडपाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

या सोहळ्यास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण राहणार आहेत.

कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम, खासदार स्मिता वाघ यांच्यासह विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन तसेच आमदार राजूमामा भोळे, अनिल पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, अमोल जावळे, चंद्रकांतपाटील आणि अमोल चिमणराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दूध संघाच्या विकासकामांच्या लोकार्पणामुळे संस्थेच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळण्याबरोबरच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या वाढीव क्षमतेमुळे दुग्धशाळेतील सांडपाण्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी दूध संघाचे सर्व सभासद आणि सदस्यांनी गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण आणि कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound