यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसर तसेच नवकार सिटी परिसरात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या तब्बल ५० रोपांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचा शुभारंभ यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार वाढवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन, संवर्धन आणि जतन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार तसेच उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेमाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

वृक्षारोपण मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ७० स्वयंसेवक व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसर तसेच नवकार सिटी परिसरात विविध ठिकाणी रोपांची लागवड केली. या माध्यमातून परिसरात हिरवळ वाढविण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. व्ही. पावरा, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. टी. वसावे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रुपाली शिरसाठ, डॉ. आर. डी. पवार, डॉ. बी. सी. पाटील आणि प्रा. अर्जुन गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.



