Home Cities रावेर “शिक्षणाच्या माध्यमातून देशाची उभारणी करायची आहे!”-  डॉ. मुबारक कापडी यांच्यासह शिक्षणतज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना...

“शिक्षणाच्या माध्यमातून देशाची उभारणी करायची आहे!”-  डॉ. मुबारक कापडी यांच्यासह शिक्षणतज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
13

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षणाच्या माध्यमातून देशाची उभारणी करणे, नव्या पिढीची वैचारिक व नैतिक जडणघडण घडवणे आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवणे, या उद्देशाने रावेर येथे सिदरा फाउंडेशन आणि अल हुदा एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ११ ऑक्टोबर रोजी मदिना कॉलनीतील डी. एम. हॉल येथे झालेल्या या मेळाव्यात शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आणि नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात हाफिज मुदस्सर यांच्या पवित्र कुरआन पठणाने झाली. त्यानंतर मुंबई येथील सय्यद शरीफ यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करणे, त्यांना शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा देणे तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, यासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

जळगाव येथील प्रमुख अतिथी सुहैल अमीर शेख यांनी आपल्या भाषणातून शिक्षणाकडे केवळ पदवी मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता व्यक्तिमत्त्व विकास आणि देशाच्या उभारणीचे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याचे आवाहन केले. जागरूक, कुशल, चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार पिढी घडवण्यासाठी शिक्षणाला स्पष्ट उद्दिष्ट आणि योग्य नियोजनाची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांसोबतच वैचारिक प्रगल्भता, नैतिक मूल्ये आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे आहे, असे शेख यांनी स्पष्ट केले. शिक्षकांनी अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांच्या चारित्र्यनिर्मितीकडे लक्ष द्यावे, तर पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. शिक्षणाच्या माध्यमातून आत्मविश्वास निर्माण करून सामाजिक समस्या समजून घेण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली पाहिजे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

मुंबई येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मुबारक कापडी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून शिक्षणाच्या प्रसारासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षण हे केवळ व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या प्रगतीपुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाचे भविष्य घडविणारे मूलभूत साधन आहे. त्यामुळे पुढील पिढीच्या शिक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, त्याग आणि योग्य नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक अडचणींमुळे मुलांचे शिक्षण थांबता कामा नये, यावर डॉ. कापडी यांनी विशेष भर दिला. ते म्हणाले, “आपण एक वेळचे जेवण केले आणि दुसऱ्या वेळेस उपाशी राहिलो, तरी चालेल; परंतु कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षणाने समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.” मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करावा आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळवून द्यावे, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.

महिला आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विशद करताना डॉ. कापडी यांनी त्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन आणि समान संधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. शिक्षित महिला कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखावेत, पालकांनी त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवावे आणि शैक्षणिक संस्थांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी अध्यक्षीय मनोगतात अशा शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन सातत्याने करण्याची आवश्यकता व्यक्त केली. शिक्षणविषयक जागृती एका कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना नियमितपणे मार्गदर्शन मिळाले पाहिजे. अशा उपक्रमांमुळे समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहोचवता येईल, असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्याला डॉ. मुबारक कापडी (मुंबई), डॉ. अब्दुल करीम सालार (जळगाव) आणि सुहैल अमीर शेख (जळगाव) यांच्यासह सय्यद शरीफ, रईस सर, शेर अफगन, हयात सेठ, अहमद सर (केंद्रप्रमुख), शेख आबिद मोहम्मद आणि इरफान सेठ आदी मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे शिक्षण, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सामाजिक विकास या विषयांवरील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रईस सर यांनी केले. मेळाव्याच्या आयोजनासाठी शफीउद्दीन सर, वसीम डॉक्टर, अल्तमश शेख, मुश्ताक सर, झुलकर्नैन आणि इतर सहकाऱ्यांनी योगदान दिले. आयोजकांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


Protected Content

Play sound