Home Cities जळगाव डंपरची ट्रॉली वीजवाहिनीला अडकली; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, वारसांना १९.९५ लाखांची भरपाई

डंपरची ट्रॉली वीजवाहिनीला अडकली; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, वारसांना १९.९५ लाखांची भरपाई

0
34

जळगाव-संजय सपकाळे । डंपरची ट्रॉली पूर्णपणे खाली न करता वाहन चालविल्याने वीजवाहिनी तुटून त्यातून झालेल्या विजेच्या धक्क्यात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी जळगाव येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मृत तरुणाच्या वारसांना तब्बल १९ लाख ९५ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले असून, दावा दाखल केल्याच्या तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत ७ टक्के वार्षिक व्याज देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायाधिकरणाचे सदस्य एस. व्ही. खोंगल यांनी हा निर्णय दिला. जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे २७ जुलै २०२० रोजी सायंकाळच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला होता. डंपर क्रमांक एमएच-१९/झेड-८६०० गावातून जात असताना वाहनाची ट्रॉली पूर्णपणे खाली न केल्याने ती रस्त्यावरील वीजवाहिनीला अडकली. त्यामुळे वीजतारा तुटून जवळच असलेल्या लोखंडी खांबावर पडला आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

वीजपुरवठा अचानक खंडित झाल्यानंतर घराबाहेर आलेले शंकर शिवाजी वैराट यांनी लोखंडी खांबाला स्पर्श केला. त्यावेळी खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर मृत शंकर वैराट यांच्या पत्नी श्रद्धा वैराट तसेच आई-वडील शिवाजी वैराट आणि मंगलाबाई वैराट यांनी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात भरपाईसाठी दावा दाखल केला होता. या दाव्याला विरोध करताना विमा कंपनीने संबंधित मृत्यू हा मोटार वाहन अपघाताच्या कक्षेत येत नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच डंपर चालकाच्या निष्काळजीपणाचा ठोस पुरावा नसल्याचा दावा करण्यात आला.

मात्र, न्यायाधिकरणाने उपलब्ध पुरावे आणि घटनेची परिस्थिती तपासल्यानंतर विमा कंपनीचा युक्तिवाद मान्य केला नाही. डंपरच्या निष्काळजी वापरामुळेच वीजवाहिनी तुटली आणि त्यानंतर झालेल्या विद्युत दुर्घटनेत शंकर वैराट यांचा मृत्यू झाला, असे न्यायाधिकरणाने नमूद केले. वाहनाच्या वापराचा आणि तरुणाच्या मृत्यूचा थेट संबंध असल्याचेही न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.

भरपाई निश्चित करताना न्यायाधिकरणाने मृताचे मासिक उत्पन्न ९ हजार रुपये गृहीत धरले. त्यासोबत भविष्यकालीन उत्पन्नवाढ, १८ गुणक तसेच इतर पारंपरिक बाबींचा विचार करून एकूण १९ लाख ९५ हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. वाहनमालक आणि संबंधित विमा कंपनीने संयुक्तपणे ही भरपाई अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंजूर झालेली भरपाईची रक्कम मृताच्या पत्नी श्रद्धा वैराट तसेच आई-वडील शिवाजी आणि मंगलाबाई वैराट या तिन्ही वारसांमध्ये समान वाटण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाहन चालविताना आवश्यक खबरदारी न घेतल्यास त्यातून घडणाऱ्या अप्रत्यक्ष दुर्घटनांनाही कायदेशीर जबाबदारीच्या चौकटीत आणले जाऊ शकते, हे अधोरेखित झाले आहे.


Protected Content

Play sound