जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स’च्या वतीने, Quick Heal Foundation आणि महाराष्ट्र सायबर सेल पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पार पडला.
संवादात्मक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात विद्यार्थ्यांना डिजिटल जगातील विविध सायबर धोक्यांची ओळख करून देण्यात आली. दैनंदिन जीवनात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत अत्यंत सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक माहिती देण्यावर विशेष भर देण्यात आला.

सत्रादरम्यान सोशल मीडिया फसवणूक, फोटो मॉर्फिंग, ओळख चोरी (Identity Theft), सोशल इंजिनिअरिंग, डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन बँकिंग फ्रॉड, संशयास्पद लिंकद्वारे होणारी फसवणूक तसेच ऑनलाईन गेमिंगमधील धोके या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर अधिक जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध प्रश्न विचारले आणि सायबर सुरक्षेबाबतच्या आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले हे सत्र विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरले. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.
सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी विशेष “मास्क ॲक्टिव्हिटी” आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेक विद्यार्थ्यांनी इंटरनेट वापरातील स्वतःचे अनुभव आणि निरीक्षणे मांडली तसेच भविष्यात सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करताना सतर्क राहण्याची आणि सायबर सुरक्षेचे नियम पाळण्याची प्रतिज्ञा घेतली. हा उपक्रम जान्हवी सपकाळे, वैष्णवी सेतवाल, राहुल चोपडे, जय ठाकूर, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील या विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे विद्यालय प्रशासन आणि शिक्षकांनी विशेष कौतुक केले.



