Home आरोग्य पिंपरूड आश्रमशाळेत महिला बचत गट मेळावा व आरोग्य शिबिराचे आयोजन

पिंपरूड आश्रमशाळेत महिला बचत गट मेळावा व आरोग्य शिबिराचे आयोजन

0
26

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिवासी समाजातील महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी पिंपरूड (ता. यावल) येथील पंडित दीनदयाल अनुदानित आश्रमशाळेत महिला बचत गट मेळावा आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावल आणि रावेर तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी विशेष आयोजन करण्यात आले असून, महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या आर्थिक क्षमतांना चालना देणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या मेळाव्यात मातृवंदना योजना तसेच घरकुल योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या घरांच्या लाभार्थींना घराची चावी व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मातृवंदना योजनेतील लाभार्थी महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. महिला बचत गटांना व्यवस्थापन कौशल्य, गटाची प्रभावी स्थापना, बँक लिंकेज, लेखा परीक्षण, उत्पादनांचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग याबाबत तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय आदिवासी विकास विभाग व महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवायचा, स्वरोजगार, लघुउद्योग, गृहउद्योग, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महिलांचे हक्क, कायदेशीर तरतुदी, आर्थिक सक्षमीकरण आणि विविध शासकीय योजनांमधून मिळणारे फायदे याबाबतही माहिती देण्यात येणार आहे. यासोबतच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिला लाभार्थी व उपस्थित महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. आरोग्य तपासणीसोबतच योग्य आहार, पोषण, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैली याबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. आदिवासी भागातील महिलांना आरोग्य सुविधा आणि आवश्यक माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावल व रावेर तालुक्यातील सर्व आदिवासी महिला बचत गट सदस्य, स्थानिक महिला तसेच मातृवंदना योजनेच्या लाभार्थींनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित महिला बचत गट मेळावा व आरोग्य शिबिरातून आदिवासी महिलांना आर्थिक स्वावलंबन, आरोग्य जागृती आणि शासकीय योजनांची माहिती मिळणार असून, महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.


Protected Content

Play sound