Home Cities पारोळा माजी उपनगराध्यक्ष सुदाम चौधरी यांना मातृशोक

माजी उपनगराध्यक्ष सुदाम चौधरी यांना मातृशोक

0
15

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहराचे माजी उपनगराध्यक्ष सुदाम रामदास चौधरी यांच्यासह चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या मातोश्री कै. गं. भा. शांताबाई रामदास चौधरी यांचे सोमवारी, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पारोळा शहरासह विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कै. शांताबाई रामदास चौधरी या माजी उपनगराध्यक्ष सुदाम रामदास चौधरी व ज्ञानेश्वर रामदास चौधरी यांच्या मातोश्री तसेच विद्यमान नगरसेविका मंगलाबाई सुदाम चौधरी यांच्या सासूबाई होत. आपल्या प्रेमळ स्वभाव, कुटुंबवत्सल वृत्ती आणि सामाजिक जिव्हाळ्यामुळे त्या परिसरात आदराचे स्थान मिळवून होत्या.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि नातसून असा मोठा परिवार आहे. त्या पंकज (पिंटू) चौधरी यांच्या आजी तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा, आझाद चौक, पारोळा येथील सल्लागार योगेश चौधरी (बाबाजी) यांच्या आजी होत.

कै. शांताबाई चौधरी यांच्या निधनाने चौधरी परिवारासह गवळी परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल तेली समाज पंच मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा, आझाद चौक, पारोळा तसेच जय भवानी मित्र मंडळ, भवानी चौक यांच्यासह विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले आहे.

कै. शांताबाई चौधरी यांच्या निधनाने चौधरी परिवारातील ज्येष्ठ आधारवड हरपला असून त्यांच्या स्मृतींना शहरवासीयांनी भावपूर्ण अभिवादन केले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो आणि चौधरी परिवारास हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच सर्वांकडून भावपूर्ण प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound