Home क्राईम बाप बनला सैतान : पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने वार, मुलीचा अंत, मुलगा गंभीर...

बाप बनला सैतान : पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने वार, मुलीचा अंत, मुलगा गंभीर जखमी !

0
3

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोटचा बाप की कसाई? असा थरकाप उडवणारा प्रश्न निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना रविवारी वडती (ता. चोपडा) येथे उघडकीस आली आहे.

एका जन्मदात्या बापानेच मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या आपल्या दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या रक्ताळलेल्या थरारात १३ वर्षीय चिमुरडीचा जागीच करुण अंत झाला, तर ११ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

निरागस बहीण-भावावर काळाचा घाला

मीरा सुभाष भिलाला (वय १३) आणि रामु सुभाष भिलाला (वय ११) ही दोन्ही भावंडे रात्री घरात गाढ झोपलेली होती. त्यांना कल्पनाही नव्हती की ज्या बापाच्या छत्राखाली ते सुरक्षित आहेत, तोच त्यांचा काळ बनणार आहे. संशयित नराधम बाप सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) याने रात्रीच्या अंधारात कुऱ्हाड हातात घेऊन झोपलेल्या मुलांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. कुऱ्हाडीचे घाव इतके वर्मी होते की, मीरा हिचा तडफडून जागीच मृत्यू झाला. तर तिचा लहान भाऊ रामु हा गंभीर जखमी झाला असून सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

थरारानंतर आरोपी जंगलात फरार; पोलिसांनी रचले जाळे

रक्ताने माखलेला हा थरार घडवून आणल्यानंतर आरोपी सुभाष भिलाला याने घटनास्थळावरून जवळच असलेल्या घनदाट जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने वादळासारखी चक्रे फिरवली. जंगलाची वेढाबंदी करत पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या.

हल्ल्याचे गूढ कायम; संपूर्ण परिसर सुन्न

या अमानुष आणि क्रूर कृत्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. घरगुती वाद, अंधश्रद्धा, की आरोपीची मानसिक स्थिती खालावली होती? या सर्व बाजूंनी अडावद पोलीस संशयिताची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेली कुऱ्हाड जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वडती गावावर शोककळा पसरली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.


Protected Content

Play sound