Home क्राईम इच्छादेवी चौकात भीषण अपघात ; भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, चौघे...

इच्छादेवी चौकात भीषण अपघात ; भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी

0
24

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर कारने तब्बल दोन वेळा पलटी घेतल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर मंगल पाटील (रा. चंदू अण्णानगर, जळगाव) हे सकाळी आपल्या दुचाकीवरून एमआयडीसी परिसरातील निर्मल पाईप कंपनीत कामासाठी जात होते. त्यावेळी इच्छादेवी चौकाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की लीलाधर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नियंत्रण सुटलेल्या कारने रस्त्यावर दोन वेळा पलटी घेतली. या दुर्घटनेत कारमधील तसेच इतर मिळून चार जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. आपल्या कुटुंबातील तरुण सदस्याचा अकाली मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण, कारचा वेग तसेच चालकाची जबाबदारी याबाबत तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. डॉ. सत्वशील पाटील यांनीही मृताच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वेगमर्यादेचे काटेकोर पालन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound