शेगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमध्ये बुधवारी पहाटेपासूनच भक्तीचा महासागर उसळला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. ‘गण गण गणात बोते’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण शेगाव नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, दर्शन आणि प्रसाद वितरण सुरू आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री संत गजानन महाराज संस्थानात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांनी श्रींचे कलश दर्शन, श्रीमुख दर्शन आणि समाधी दर्शन घेत आपल्या श्रद्धा आणि सेवाभावाचे अर्पण केले. संस्थानात नियोजनबद्ध पद्धतीने दर्शन व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांसाठी प्रसाद वितरणाची सुविधाही दिवसभर सुरू आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध भागांतून दिंड्या शेगावमध्ये दाखल झाल्या आहेत. मलकापूर येथून आलेल्या दिंडीने यंदाही सलग १९ वर्षांची वारीची परंपरा कायम राखली आहे. या दिंडीत सुमारे ९०० महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले असून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनाम संकीर्तनात त्यांनी शेगावमध्ये प्रवेश केला. भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिक उत्साहाने भारावून गेला आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक मान्यवरांनीही श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक तथा भाजप प्रवक्ते विश्वासराव पाठक यांनी श्री गजानन महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन राज्यातील शेतकरी सुखी-समाधानी राहावेत, भरपूर पाऊस पडावा आणि सर्वांच्या जीवनात समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली. यावेळी विश्वासराव पाठक यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करत श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे समाजात शांतता, ऐक्य आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहावी, अशी भावना व्यक्त केली. गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थान परिसरात सुरक्षा, वाहतूक आणि भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.



