यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या चुंचाळे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी आणि श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमीत बुधवारी (२९ जुलै) भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून तसेच परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येणार असून, महाप्रसाद, पालखी मिरवणूक, भजन-भारूड आणि विविध धार्मिक विधींमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने नटणार आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री समर्थ वासुदेव बाबा, श्री समर्थ रघुनाथ बाबा आणि श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या शिष्यगण परिवारातर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या पवित्र स्थळी दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान आणि अध्यात्मिक संस्कार जपण्याच्या उद्देशाने हा उत्सव मोठ्या श्रद्धाभावाने साजरा केला जातो. बुधवारी पहाटे ५ वाजता मूर्ती अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी ६ वाजता मारुती अभिषेक, दुपारी १२.३० वाजता महाआरती, तर सायंकाळी ७ वाजता सायंआरती होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून आरतीच्या वेळा वगळता दिवसभर भजन, भारुडे आणि आध्यात्मिक कार्यक्रम सुरू राहतील. दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून, या प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सायंकाळी ५ वाजता गावातून पारंपरिक पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री ८ वाजता दहीहंडी फोडण्याचा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या उत्सवासाठी शिरपूर येथून पायी दिंडीचे आगमन मंगळवारी (२८ जुलै) होत असून, नायगाव, किनगाव, दहिगाव, सौखेडा, गिरडगाव, वाघोदा, मनवेल, साकळी आदी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. श्री समर्थ वासुदेव बाबा मंदिराच्या सुशोभीकरणासह भाविकांच्या निवासाची सुविधा उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले असून, त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी काही रिक्षाचालक मोफत वाहतूक सेवा उपलब्ध करून देत असल्याने भक्तांकडून त्यांचेही कौतुक होत आहे.



